तरुणाला पिस्तूल दाखवून दमदाटी करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर कारवाई व्हावी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Mumbai-police-696x392-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पोलिसांचा मान-सन्मान राखला गेलाच पाहिजे. परंतु, सामान्य नागरिक जेव्हा तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जातो, तेव्हा त्याला कुठे मान-सन्मान मिळतो. एखाद्याची तक्रार खरी असतानासुद्धा खोट्या लोकांना फक्त पैशासाठी पाठीशी घातलं जात आणि सत्य असलेल्या नागरिकांना नाहक त्रास दिला जातो. नको ते प्रश्न विचारून जसे की त्यानेच जसाकाही अपराध केला आहे, अशी वागणूक त्याला मिळते.
अशीच काहीशी घटना शुक्रवारी सायंकाळी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात घडली. एका उच्चशिक्षित तरुणाला पोलीस निरीक्षकाने शिवीगाळ करुन बुटाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस निरीक्षकाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पाहून घेण्याची धमकीसुद्धा त्या उच्चशिक्षित तरुणाला दिली असल्याचा आरोप तरुणाने पोलीस चौकीत दिलेल्या तक्रारीत केला आहे.
महेश गोळे (रा. दिघी) तक्रारदाराचे नाव असून, रवींद्र कदम असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. मुळात हा प्रकार पोलिसांच्या कर्तबगारीला काळिमा फासणारा असाच आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी हा उच्चशिक्षित तरुण स्वतः तक्रारदार असतानासुद्धा १४९ नुसार नोटीस दिली होती. तक्रारदारालाच उलट नोटीस दिल्याने या तरुणाने वरिष्ठ पोलिसांकडे या पोलीस निरीक्षकाची तक्रार केली होती. यात गैर असे काय होते? मुळात नागरिकांच्या रक्षणाची शपथ घेणाऱ्या पोलीस दलातील काही स्वार्थी पोलिसांमुळेच आज सर्वत्र पोलीस खात्याचे नाव बदनाम होत आहे.
संचारबंदीचा आदेश मोडला म्हणून नागरिकांवर लाठ्या चालविणारे पोलिसच कधी भुकेल्यांना अन्न पोहोचवताना दिसतात. दुसरीकडे लाठी बसली म्हणून पोलिसांवर ओरडणारे नागरिकही बंदोबस्तावरील पोलिसांना अन्न-पाणी देताना दिसतात. दोन्ही ठिकाणी माणुसकीचे दर्शन घडताना दिसते. इथे मात्र, कायद्याचं रक्षण करणाराच कायदा हातात घेताना दिसतो आहे. कुणालाही मारहाण करणे हा प्रकार अतिशय वाईट व कायदा मोडणारा आहे.
मात्र, नेहमी कायद्याच्याच बाजूने पोलिसांची भूमिका असावयास हवी. केवळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करतो, म्हणून त्याच्यावर पाळत ठेवून, त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून, त्यालाच दमदाटी होत असेल तर, शहरातील जाणकार नागरिक असा प्रकार कधीही खपवून घेणार नाहीत. राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन, अशा कर्तव्यशून्य पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.