राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिका-यांना दणका, पार्थ पवारांनी अचानक आयुक्तांची घेतली भेट
- भेटीबाबत गुप्तता बाळगण्याचे कारण काय ?
- पार्थ पवार आणि कुटुंबियांचा स्थानिक पदाधिका-यांवर भरवसा नाय
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शनिवारी (दि. 11) अचानक भेट घेतली. त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये पार्थ पवार यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उभारलेल्या वॉर रूमलाही भेट दिली.
युवानेते पार्थ पवार यांनी आपल्या भेटीबाबत अत्यंत गुप्तता बळगली होती. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्याला सोबत न घेता पार्थ पवार यांनी महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या नियोजनाची प्रशासकीय माहिती जाणून घेतली. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी असून लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या कामाचे नियोजन कसे केले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय कशी केली आहे. मजूर लोकांवर लॉकडाऊनमुळे वाढणारा ताण आणि नियमांची शिथीलता याबाबत सविस्तर माहिती पार्थ पवार यांनी घेतली.
कोरोना विषाणुने आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 138 रुग्ण दगावले. सध्या वायसीएम रुग्णालयातील कोवीड टेस्टींग सेंटरसह भोसरी रुग्णालय तसेच पालिकेच्या अन्य रुग्णालयातील सुविधा, कोरोना रुग्णांवर होणारे उपचार याबाबत त्यांनी आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. तसेच, शिक्षकांना 7 वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात देखील त्यांनी चर्चा केली.
पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये घातले लक्ष
मागच्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते माजी विरोधीपक्ष नेते दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी आणि त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. त्यानंतर लगेचच पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातले आहे. कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणता येईल, याबाबत त्यांनी आयुक्तांची कार्यप्रणाली जाणून घेतली.