पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/6.jpg)
अनेकदा बेड शिल्लक असतानाही कोरोना संशयित रुग्णांना डावलले जातेय
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढू लागला आहे. शहरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच हजाराहून अधिक झाली आहे. महापालिका रुग्णालयात बेडची संख्या अपुरी पडू लागली असतानाही शहरातील खाजगी रुग्णालये मात्र बेड शिल्लक नसल्याची कारणे देवून कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देवू लागले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात पाच हजार 203 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात आजपर्यंत तीन हजार 138 रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. तर एक हजार 968 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात अनलाॅक झाल्यानंतर कोरोना संसर्गचा फैलाव वाढला आहे. दररोज शेकडो रुग्ण संशयित आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यात त्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. मात्र, महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना आणि केंद्राच्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. परंतू, खाजगी रुग्णालयात या योजनेंतून उपचार मागणा-या रुग्णांना डावलले जावू लागले आहे. त्या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याची कारणे सांगून रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचारास नकार देणा-यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
‘त्या’ रुग्णालयात हेल्प डेस्क तयार करणार
राज्य शासनाच्या निर्देशानूसार खाजगी रुग्णालयात किती बेड हे उपलब्ध आहेत. याबाबत रुग्णालय प्रमुखाकडून आढावा घेतला. त्यामध्ये बिर्ला रुग्णालयात १५०, चिंचवड लोकमान्य हॉस्पिटल १००, मोहननगर ईएसआय हॉस्पिटल १००, निरामय हॉस्पिटल ४०, स्टर्लिंग हॉस्पिटल १००, स्टार हॉस्पिटल ५०, ॲक्वार्ड हॉस्पिटल २००, पिंपरी डि.वाय.पाटील हॉस्पिटल ३०० या रुग्णालयात 7 जुलैअखेर एवढे बेड उपलब्ध आहेत. तरीही कोरोना रुग्णांना उपचार दाखल केले जात नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात हेल्प डेस्क तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी महापालिकेचे दोन अधिकारी नियुक्त करण्यात येतील. त्यांच्याकडून दररोज रुग्णालयाची आकडेवारी घेण्यात येणार आहे. – नामदेव ढाके – सत्तारुढ पक्षनेते, महानगरपालिका