निगडी सेक्टर 22 मध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना जूलाब उलट्याचा त्रास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/6-1.jpg)
तत्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा, माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी मागणी
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अकार्यक्षम अधिका-याच्या दुर्लक्षामुळे निगडी सेक्टर 22 मधील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होवू लागला आहे. कित्येक नागरिकांना जूलाब व उलट्याचा त्रास होवून सर्वजण भयभयीत झाले आहे. त्यामुळे सेक्टर 22 परिसरात तत्काळ शुध्द पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी केली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून स्काडा प्रणाली विकसित केलेली आहे. पावसाळ्यात शहरवासियांना शुध्द पाणी पुरवठा करणे ही पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी आहे. मात्र, तेथील अकार्यक्षम अधिका-यामुळे निगडी सेक्टर 22 परिसरात अशुध्द पाणी पुरवठा होत आहे.
निगडी सेक्टर २२ मधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात अशुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना उलट्या व जुलाब होवू लागल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दुषीत पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात कोरोना संसर्गाने नागरिकात भितीचे वातावरण आहे. त्यातच अशुद्ध पाणी पुरवठा, दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे नागरिकांना पोटदुखी, उलट्या व जुलाबाचे आजार वाढले आहेत. याबाबत प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली गेलेली नाही.संबधित अधिकारी वर्गाकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. वेळोवेळी पाण्याच्या टाकीचीही स्वच्छता करणे, जलवाहिन्यांना कुठे गळती आहे का? त्याची तपासणी करण्यात यावी. दिवसेंदिवस सेक्टर.२२ मधील विवीध ठिकाणच्या तक्रारी येऊन देखील महापालिका प्रशासनाला “अशुध्द पाण्याचा प्रश्न” हा महत्वाचा वाटत नाही का? जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरु करावा अन्यथा महापालिकेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तानाजी खाडे यांनी दिला आहे.