कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी ‘डब्लूएचओ’चे पथक चीनला जाणार
नवी दिल्ली – डब्लूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक पुढच्या आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी हे पथक जाऊन कोरोना व्हायरसचा उगम नेमका कुठून झाला ते तपासणार आहे. सध्याच्या घडीला चीन याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने चीनला हे सहा महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, कोरोनाची उत्पत्ती आणि प्रसार नेमका कसा झाला ते आम्हाला सांगा. मात्र चीनकडून समाधानकारक उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक चीनच्या दौऱ्यावर जाणार असून हे पथकच कोरोनाचा प्रसार नेमका कसा सुरु झाला याचा शोध घेणार आहे. वुहान हे कोरोनाचे केंद्र आहे असे चीनने सांगितले मात्र या व्हायरसची लागण नेमकी मानवाला कशी झाली ते पुरेसे स्पष्ट केले नाही.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जानेवारी महिन्यातच हे स्पष्ट केले होते की लवकरात लवकर चीनने या रोगाच्या उत्पत्ती आणि प्रसाराची माहिती द्यावी जेणेकरुन या रोगाचा जगभरातला प्रसार रोखता येईल. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे आता या संघटनेचे एक पथक पुढील आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे.