कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पायाने बटण दाबा, लिफ्ट चालवा,मुंबई महापालिकेचा नवा प्रयोग
मुंबई : मुंबई महापालिकेने लिफ्टमधून होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनोखा प्रयोग केला आहे. पायाने बटण दाबा, लिफ्ट चालवा, असा नवा प्रयोग महापालिकेच्या दोन विभाग कार्यालयात सुरु करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लिफ्ट हाताच्या बोटांनी स्पर्श न करता चालवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
लिफ्टमध्ये कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता महापालिकेच्या जी-दक्षिण आणि एम-पश्चिम विभाग कार्यालयांमधील लिफ्टमध्ये प्रायोगिक तत्वावर पायाने बटण दाबून चालवण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेने ओमटेक कंपनीच्या माध्यमातून ही संकल्पना राबवली आहे.
या संकल्पनेनुसार स्पर्श न करता पायाने बटणदाबून लिफ्टमध्ये प्रवेश करणे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या मजल्यावर जायचे आहे, त्या मजल्याच्या क्रमांकावर पायाने दाब देत बटण दाबता येते. ज्यामुळे हाताने स्पर्श न करता कर्मचाऱ्यांना लिफ्टमधून प्रवास करता येत आहे. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पन महापालिकेच्या संपूर्ण मुंबईतील इमारतींमध्ये राबवण्याचा विचार केला जात आहे.