अजित पवार यांच्यावर आरोप करण्याची नामदेव ढाके यांची लायकी – नाना काटे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Nana-kate-vs-namdev-dhake.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करण्याची नामदेव ढाके यांची लायकी नाही. त्यांनी महापालिका आणि आपला पक्ष सांभाळावा. अजितदादांच्याबाबत बोलण्याएवढी ढाके यांची उंची नाही. यापुढे बोलण्याचा प्रयत्न केल्यास याद राखा, अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांचा समाचार घेतला.
पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदार संघातून झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागलेला आहे, अशी टिका भाजप पक्षनेते नामदेव ढाके यांनी काल केला. त्याला विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट टाकून टिकेला शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर टिका करण्याची ढाके यांची लायकी नाही. मुळात ढाके हे लाटेत निवडून आलेले नगरसेवक आहेत, हे त्यांनी विसरू नये. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पालकमंत्री आहेत, हेच भाजपच्या जिव्हारी लागलेले आहे. नामदेव ढाके यांनी पालिका सांभाळावी, त्यांचा पक्ष सांभाळावा. यापुढे जर असे विधान केले तर त्याला जशासतशा शब्दांत उत्तर दिले जाईल, असे नाना काटे म्हणाले.
दादांनी शहराचा काय विकास केला, हे संपूर्ण शहराला माहित आहे. राज्याचे उपमुख्यंत्री म्हणून दादा राज्याचा आढावा घेऊनच सूचना वजा आदेश देत असतात. दर शुक्रवारी ते पुण्यात अधिका-यांची बैठक घेतात. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि इतर अधिकारी देखील त्यांच्या बैठकीला उपस्थित असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी दादांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत येऊन कोरोनाच्या संदर्भात माहिती घेतली. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना घेण्यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. ही दादांची काम करण्याची पध्दत आहे, असेही काटे यांनी म्हटले आहे.