मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये: गोपीचंद पडळकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Gopichand-Padalkar-Uddhav-Thackeray.jpg)
पंढरपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये, अशी मागणी भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शेतकरी कुटुंबाला महापूजेचा मान देण्याचे पडळकर यांनी सुचवलेले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान दरवर्षी मुख्यमंत्र्यांना सपत्नीक देण्याची परंपरा आहे.
“सध्या कोरोना संसर्ग असल्याने पंढरपुरात बाहेरील व्यक्ती, महाराज मंडळींना प्रवेश नसेल, तर यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी एकादशीची महापूजा करु नये” असं गोपीचंद पडळकर पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. सामान्य शेतकरी, वारकरी कुटुंबाला विठ्ठल-रखुमाईच्या महापूजेचा मान द्यावा, असा आग्रह पडळकर यांनी धरला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला ‘कोरोना’ आहेत, अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे. धनगर समाजाला फडणवीस सरकारने तरतूद केलेले एक हजार कोटी सुद्धा महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. सगळा फार्स सुरु आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.