धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठक अन् वर्धापनदिनाला हजर असले तरी आमच्याकडून नियमांचं पालन : आरोग्य मंत्री
मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग आता सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयात पसरताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणि विशेषतः राष्ट्रवादीतील काही नेत्यांना संसर्गचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले. धनंजय मुंडे हे कॅबिनेट आणि वर्धापन दिनाला उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सक्त आदेशाप्रमाणे आम्ही सर्व नियम पाळले होते. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपण काळजी घेणे गरजेचं असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.





