ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार, म्हणाले ‘डील होऊ शकते’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/america-iran.jpg)
अमेरिका-इराण संबंधातील तणाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणचे टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही देश युद्धाच्या उंबरठयावर पोहोचले होते. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याचा सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. पण आता दोन्ही देशातील संबंध हळूहळू सामान्य होत आहेत.
मायकल व्हाइट या अमेरिकन बंधकाची झालेली सुटका हे त्याचेच संकेत आहेत. इराणने त्यांच्या ताब्यात असलेल्या मायकल व्हाइट या अमेरिकन बंधकाची सुटका केल्याबद्दल गुरुवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले आहेत. ‘आपल्यात डील होऊ शकते, हेच यातून दिसून येते’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
“मायकल व्हाइटबरोबर आताच माझे फोनवरुन बोलणे झाले. तो आता झ्युरिचमध्ये पोहोचला आहे. थोडयाच वेळात तो अमेरिकेला येणाऱ्या विमानामध्ये बसेल” असे टि्वट ट्रम्प यांनी केले होते. “मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी संभाळल्यापासून आतापर्यंत ओलीस ठेवलेल्या ४० अमेरिकन नागरिकांची सुटका करुन त्यांना परत आणले आहे. थँक्यू इराण, आपल्यात डील होऊ शकते हेच यातून दिसून येते” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मायकल व्हाइट यांना २०१८ साली इराणच्या मशहाद शहरातून अटक करण्यात आली होती. मायकल ६८३ दिवस इराणच्या कैदेत होते.