#CoronaVirus: तीन वर्षांच्या बालकासह आईची कोरोनावर मात
शहरातील हिरे रुग्णालयाच्या करोना विलगीकरण कक्षात उपचार घेतल्यानंतर तीन वर्षांचा बालक आणि त्याच्या आईने करोनावर मात केली. करोनामुक्त होणारा धुळ्यातील हा सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे. आतापर्यंत ९२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गुरूवारी दुपापर्यंत नव्याने सहा रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला.
शहरातील गल्ली क्रमांक चारमधील पुरुष करोनाबाधित आढळला. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील तीन वर्षांचा बालक आणि त्याची आई करोना बाधित आढळली. त्यामुळे बालकासह त्याच्या आईवर करोना विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. इतर बाधितांप्रमाणे बालक आणि त्याच्या आईने उपचाराला प्रतिसाद दिल्यामुळे ते करोनामुक्त होऊ शकले.
दोघांना रूग्णालयातून सोडण्याआधी पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल नकारात्मक आल्यावर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अधिष्ठाता डॉ. पल्लवी सपळे, डॉ. दीपक शेजवळ, प्रमुख अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी आणि करोना विलगीकरण कक्षात उपचार करणारे डॉक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आई आणि मुलाला निरोप दिला. दरम्यान, धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाला बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये नवीन सहा रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यात धुळे शहरातील पाच आणि शिंदखेडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या १७७ झाली आहे.