उत्तर आणि दक्षिण कोरियाही आता मैत्रीच्या मार्गावर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/north-and-south-korea.jpg)
सेऊल – अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच आता उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या शेजारील देशांचेही एकमेकांशी असलेले संबंध सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही देशांनी याच महिन्यात लष्करी आणि रेडक्रॉस पातळीवर शांतता चर्चा करण्यास तयारी दर्शवली आहे.
1950 मध्ये झालेल्या कोरियन युद्धानंतर दोन्ही देशांतील जी कुटुंबे एकमेकांपासून दुरावली आहेत त्यांना एकत्र आणण्याची संधी देण्याची तयारीही या दोन्ही देशांनी दर्शवली आहे.
दोन्ही देशांच्या आज झालेल्या उच्च पातळीवरील शिष्टमंडळाच्या चर्चेत दोन्ही देशांच्या सीमावर्ती भागात एकमेकांशी संपर्कासाठी लायझनिंग ऑफीसही स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाने म्हटले आहे की उत्तर कोरिया आता अमेरिकेशीही चर्चा करणार आहे. पण त्यांनी आपला वादग्रस्त अण्वस्त्र निर्मीतीचा कार्यक्रम सोडून देऊन स्वता विषयीची विश्वासार्हता वाढवण्याची गरज आहे.
आज निश्चीत करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दोन्ही देशांमधील लष्करी पातळीवरील चर्चा 16 जूनला आणि रेडक्रॉस पातळीवरील चर्चा 22 जुनला होणार आहे. तसेच 18 जूनला दोन्ही देशांच्या क्रीडा मंत्रालय पातळीवरील अधिकाऱ्यांचीही चर्चा होणार आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे ईन यांनी गेल्या दोन महिन्यात दोनदा उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांच्याशी चर्चा केली आहे.