#CoronaVirus: साताऱ्यात दिवसभरात तब्बल ५२ नवे रुग्ण
![Corona spread since October 2019? Study reveals 'this' information](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-e-chernobyl.jpg)
सातारा जिल्ह्यात बुधवारी ५२ जणांचे तपासणी चाचणी अहवाल सकारात्मक आले. एकाच दिवसात एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्ण निष्पन्न झाल्याने जिल्ह्य़ात घबराट पसरली आहे. जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या ३९४ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्य़ातील मृतांचा आकडाही ४ ने वाढून तो १३ झाला असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.
सातारा जिल्ह्यातील विविध करोना काळजी केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित (संशयित) म्हणून दाखल असलेल्या ५२ जणांचे तपासणी चाचणी अहवाल बुधवारी सकारात्मक आले. आतापर्यंत एकाच दिवसात एवढय़ा मोठय़ा संख्येने पहिल्यांदाच रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यामुळे जिल्ह्य़ात घबराट पसरली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे परगावहून आलेले आहेत. आजवर १२६ रुग्ण करोनामुक्त होत घरी परतले आहेत. सध्या करोनाबाधित म्हणून २५५ जण उपचार घेत आहेत.
आंभोरीतील बाधिताचा मृत्यू
दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारा मुंबई येथून प्रवास करून आंभोरी (ता. खटाव) येथील ५३ वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या पुरुषाला तीव्र श्वसनदाहाचा आजार होता. तसेच मुंबई येथून प्रवास करून आलेला भाटकी (ता. माण) येथील ५४ वर्षीय पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील १८, कृष्णा मेडिकल कॉलेजमथील २७, वाई ग्रामीण रुग्णालयातील ५२, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६८ आणि फलटण उपजिल्हा रुग्णालयातील ७ अशा एकूण १७२ जणांच्या घशातील स्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.