#CoronaVirus | सुनेच्या संपर्कात आल्याने सासूचा अहवाल पॉझिटिव्ह
उस्मानाबाद | जिल्ह्यामध्ये सद्य:स्थितीत कोरोनाचे २६ रुग्ण आढळले आहेत. सध्या २१ जणांवर उपचार सुरु आहेत. तर पाच जण उपचारानंतर बरे होउन घरी परतले आहेत. दरम्यान, परराज्यासह परजिल्हयातून येणाऱ्यांचा ओघ सुरुच आहे. सद्य:स्थितीला पाच हजार १५८ इतक्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये तीन हजार ४५३ लोकांना होम क्वारंटाईन, तर एक हजार ७०५ लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर चारशे लोकांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे.
सुनेनंतर सासूचा अहवाल ही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. गावातील आणखी एक महिला पॉझिटीव्ह आल्याने शिराढोणमधील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपुर्वी शिराढोण गावातील एक महिला लातूर शहरात उपचारासाठी गेली होती. मात्र सदर महिला मुंबई येथून काही दिवसांपूर्वी परतली होती. त्यामुळे महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना तत्काळ क्वारंटाईन करण्यात आले होते. रुग्ण महिलेच्या ८० वर्षीय सासुचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.