#Lockdown: सांगोला तालुक्यात टाळेबंदीत पुन्हा घोडा, बैलगाड्यांच्या शर्यती; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Bailgada.jpg)
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर टाळेबंदी अंमलात असतानाही सांगोला तालुक्यात बैलगाड्या व घोडागाड्यांच्या शर्यतीचे प्रकार घडत आहेत. या तालुक्यातील उदनवाडी येथे हा प्रकार उजेडात आला असता संबंधित सहाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या महिन्यात टाळेबंदी असताना त्याची पर्वा न करता सांगोला तालुक्यातील घेरडी येथे बैलगाड्या व घोडागाड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी संबंधितांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत गावच्या पोलीस पाटलाला सेवेतून निलंबितही करण्यात आले होते.
या घटनेनंतर उदनवाडी येथे बैलगाडी व घोडागाड्यांच्या शर्यतीचा दुसरा प्रकार उजेडात आला. एका मोकळ्या शेतात बैल व घोड्यांच्या पाच जोड्यांच्या गाड्या आणून तेथे शर्यतीचा सराव केला जात होता. ही माहिती मिळाल्यानंतर तेथे पोलिसांनी हस्तक्षेप केला.
याप्रकरणी विजय सोपान अलदर (वय ३१), धनाजी तातोबा सरगर (वय ३१), नवनाथ ऋषिधर वलेकर (वय २१), साईनाथ बापू सरगर (वय २३), बापूराव चंद्रकांत सरगर (वय ५०) व भीमराव देवीदास लवटे (वय २२) या सहाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग नियंत्रण कायदा, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आदींच्या तरतुदींखाली ही कारवाई करण्यात आली आहे.