#waragainstcorona: सोलापूरकरांची साथ महत्वाची : पालकमंत्री भरणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/3-14.jpg)
सोलापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी
सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी सोलापूरच्या नागरिकांची साथ महत्वाची आहे, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले.
कोरोना विषाणूच्या प्रसाराचा अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथील विश्रामगृहात बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहराच्या ठराविक भागातच कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या विशिष्ठ भागावरच लक्ष केंद्रीत केले आहे. येथे थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑफिसमीटरच्या सहाय्याने नागरिकांचे सर्व्हेक्षण केले जात आहे, असे सांगितले.
यावर पालकमंत्री भरणे यांनी सांगितले की, नागरिकांचे सर्व्हेक्षण करणे, तपासणी करणे, कंटेनमेंट झोनमधील ज्येष्ठ नागरिकांचे अलगीकरण करणे असे उपाय करा. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा. सोलापुरातील ट्रेसिंग, टेस्टींग वाढवले गेले आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. मात्र नागरिकांनी यावरुन घाबरुन जाऊ नये.
जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन सोलापूरकरांची पूर्ण काळजी घेत आहेत. मात्र प्रशासनाला सोलापूरकरांनी साथ द्यायला हवी, असे ते म्हणाले.
यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे,उप जिल्हाधिकारी किशोर पवार, हेमंत निकम, सचिन ढोले, पंढरपूरचे नगरपरिषद मुख्यधिकारी अनिकेत मानोरकर, जिल्हा उत्पादन शुल्क अधिक्षक रवींद्र आवळे, डॉ. संतोष नवले, डॉ. प्रदीप ढेले, डॉ भीमाशंकर जमादार आदी उपस्थित होते.