महापालिकेच्या जेवनावर भाजपा नगरसेवकांची ‘राजकीय पोळी’; राष्ट्रवादीचा आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/11-3.jpg)
पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील गरजूंना भोजन पुरविले जात असतानाही हे आपणच पुरवित असल्याचे भासवून शहरातील भारतीय जनता पक्षाचे नेते आपली “राजकीय’ पोळी भाजून घेत आहे. तसेच करोनासारख्या महामारीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून चाललेला प्रकार दुर्देवी असल्याची टीका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असून
याला महापालिका आयुक्तही पाठबळ देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेत “करोना’चा कहर सुरु असतानाच भाजपाकडून पालिकेद्वारे चाललेल्या खरेदीत भ्रष्टाचार, अन्नधान्य वाटप, भोजन व्यवस्था आणि त्यासोबत भाजप राजकारण करत असल्याचा आक्षेप नोंदवित टीका केली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व काही नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी बोलताना संजोग वाघेरे म्हणाले, महापालिकेच्या वतीने शहरातील गरीब व गरजू व्यक्तींसाठी जेवण उपलब्ध करून दिले आहे. यासाठी पूर्ण अन्नधान्य महापालिका देत असून इतर येणाऱ्या खर्चासाठी प्रत्येक प्रभागासाठी 3 लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. तसेच पालिकेचे कर्मचारी व अधिकारीही कष्ट घेत आहेत.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष वाघेरे म्हणाले की, भाजपाच्या काही महारथींनी केवळ व्यवस्था उपलब्ध करून दिलेली असताना आपणच हे भोजन वाटत असल्याचा आव आणत बातम्या छापून आणल्या आहेत. तर ज्या ठिकाणी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी बॅनर लाऊन प्रसिद्धी मिळविण्याचा दुर्देवी प्रकार चालविला आहे. हजारो लोकांना जेवण पुरवित असल्याचे सांगितले जात असले तरी अत्यंत कमी लोकांपर्यंतच महापालिकेच्या जेवणाचा फायदा पोहोचत आहे. 85 हजार लोकांना जेवण दिले जात असल्याचा दावा केला जात असला तरी हा पोकळ दावा असून निम्म्या लोकांनाही जेवण मिळत नसल्याचे वाघेरे म्हणाले.
जेवणामध्ये पोळी, भाजी, भात आणि वरण असले पाहिजे, असा निकष असताना केवळ दाळभात दिली जात आहे. काहीजण लाप्सी देत आहेत. हा प्रकारच अत्यंत चुकीचा असून या चुकीच्या प्रकाराला प्रशासन पाठीशी घालत आहे. इस्कॉनच्या माध्यमातून दिलेल्या जेवणावरही प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे त्यांच्या जेवणाचाही दर्जा घसरल्याचे वाघेरे यांनी सांगितले. अनधिकृत हातगाड्या व गोडावूनमधून विक्री होणारा भाजीपाला आणि फळे जप्त करून इस्कॉनला महापालिकेने दिली आहेत मात्र त्याचे वाटप इस्कॉनने गोर गरिबांना केले नाही. त्यांना दिलेल्या फळे आणि भाज्यांचा हिशोब महापालिकेने घ्यावा, अशी मागणी नाना काटे यांनी यावेळी केली.
सेंट्रल किचनची गरज
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात तीन सेंट्रल किचन उभारावेत, अशी मागणी केली होती. आयुक्तांनी सेंट्रल किचन उभारले असते तर नागरिकांची सध्या होत असलेली गैरसोय झाली नसती. मात्र भाजपाच्या नेत्यांच्या दबावाखाली येऊन तसेच भाजपावाल्यांना राजकीय पोळी भाजू देण्यासाठी आयुक्तांनी चुकीचा निर्णय घेतल्याचे संजोग वाघेरे यांनी सांगितले. अनेक भागामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून भोजन देणेही बंद केल्यामुळे अजूनही वेळ गेलेली नसून सेंट्रल किचन सुरू करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
निवारा केंद्रातील लोकांना घरी पाठवा
पिंपरी-चिंचवड शहरातील अथवा इतर भागातून आपल्या गावी निघालेल्या अनेकांना पकडून निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. बळजबरीने असा प्रकार करणे चुकीचा असून ज्या नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले आहे त्यांना त्यांच्या घरी जावू द्यावे, तसेच घरी जाण्यास परवानगी मिळत नसेल तर ते ज्या ठिकाणाहून आले आहेत त्या ठिकाणी त्यांना सन्मानपूर्वक जाऊ द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी यावेळी केली. या नागरिकांवर अन्याय करू नये, असेही काटे यावेळी म्हणाले.