#Coronolockdown;पुण्यातील स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार, 15 हजार नागरिकांचा समावेश
पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे प्रशासनाकडून स्थलांतरित मजुरांची पहिली यादी तयार केली आहे. यात जवळपास 15 हजारहून अधिक नागरिकांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाला ई-मेलद्वारे अनेक स्थलांतरित मजुरांनी घरी परतण्यासाठी अर्ज केले होते. या अर्जाची छाननी करुन पुण्यातील स्थलांतरिताची पहिली यादी तयार केली आहे. यात 15 हजार 502 परप्रांतीयांचा मूळ गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यात सर्वाधिक मजूर हे उत्तरप्रदेश आणि बिहारचे रहिवाशी आहे.
उत्तर प्रदेशातील जवळपास 4 हजार 048 आणि बिहारमधील 3 हजार 810 नागरिकांचा या यादीत समावेश आहे. त्याच बरोबर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या 583 नागरिकांनीही यात नोंदणी केली आहे.
संचारबंदीमुळे पुण्यात गेल्या दीड महिन्यापासून परप्रांतीय शहरातील वेगवेगळ्या भागात अडकले होते. त्यांच्या परतण्याच्या मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार नागरिकांना परवानगी देण्याची त्यांच्या नोंदणीची आणि वाहन व्यवस्था जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे.
दरम्यान पुण्यात 2 मे पर्यंत जवळपास साडेपाच हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. पुणे शहर हे रेड झोनमध्ये असल्याने नागरिकांना गावी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या सर्व माहिती संकलित करण्यात येत असून अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.