#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाबाधित बाळंतीण महिलेचा मृत्यू
![National equestrian student commits suicide in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/death_5539402_835x547-m-1.jpeg)
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील एका करोनाबाधित बाळंतीण महिलेचा सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे सोलापुरात करोनाबळींची संख्या आता सात झाली आहे.आज मृत्यू झालेल्या करोनाबाधित महिलेचा वैद्यकीय उपचारासाठी मोहोळ, पंढरपूर व सोलापूरसह विविध चार रूग्णालयांतून प्रवास झाला होता.
दरम्यानच्या काळात संबंधित रूग्णालयांपैकी एका रूग्णालयातील काही डॉक्टर व परिचारिकांसह अन्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊन त्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. सुदैवाने तिच्या संपर्कात आलेल्या अन्य सुमारे ७५ व्यक्तींची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत.
मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे राहणारी मृत महिला सात महिन्यांची गरोदर होती. शारिरीक त्रास होऊ लागल्यामुळे तिला गेल्या महिन्यात विजापूर रस्त्यावरील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तिला अन्य दुसऱ्या नामवंत रूग्णालयात हलविण्यात आले होते. हे रूग्णालय सध्या ‘सील’ करण्यात आले आहे. या रूग्णालयातून मृत महिलेला पुन्हा पंढरपुरातील एका रूग्णालयात हलविण्यात आले असता तिने जुळ्यांना जन्म दिला होता. परंतू, त्यापैकी एका नवजात बाळाचा लगेचच मृत्यू झाला. तर बाळंतीण महिलेमध्ये करोनाची लक्षणे दिसू लागली असता तिची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यात तिला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.
यानंतर तिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.सोलापुरात काल रविवारपर्यंत करोनाबाधित रूग्णांची संख्या १२८ वर पोहोचली होती. यात सहा मृतांचा समावेश होता. मृतांची संख्या आता सात झाली आहे. मृतांमध्ये चार महिला व तीन पुरूषांचा समावेश आहे. दरम्यान, एकूण रूग्णांपैकी १९ जणांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे.