आजपासून लॉकडाऊनमध्ये सवलती, कर्नाटक-दिल्लीमध्ये दारूच्या दुकानाबाहेर लांब रांगा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/lockdown2.jpg)
नवी दिल्ली | देशभरात आजपासून लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. सरकारने ही बंदी दोन आठवड्यांसाठी वाढविली आहे. यासह, अनेक राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सवलती देखील सुरू झाल्या आहेत. सकाळपासून गोवा आणि आंध्र प्रदेशमध्ये सलून सुरू झाले. त्याचबरोबर कर्नाटकात सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. स्टॅन्ड अलोन शॉपमधून दिल्लीतही मद्य विक्री केली जाऊ शकते. सकाळपासूनच या ठिकाणी लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.
पुद्दुचेरीमध्ये सोमवारीपासून कारखाने सुरू झाले. या केंद्र शासित प्रदेशात सकाळी 5 ते संध्याकाळी 6 या वेळेत सर्व दुकाने आणि रेस्टॉरंट्स उघडण्याची परवानगी आहे. मात्र, रेस्त्राँमधून खाद्यपदार्थ पार्सल घेता येतील. येथे दारूची दुकाने उघडण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पद्दुचेरीमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण आहेत. यातील 6 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 42 हजार 628 वर पोहोचली आहे. एकट्या महाराष्ट्रात 13 हजार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे एकूण संक्रमितांच्या 31% आहे. रविवारी महाराष्ट्रात 678, दिल्लीत 427, गुजरातमध्ये 374 पंजाबमध्ये 330, उत्तरप्रदेशात 158, राजस्थानात 114, मध्यप्रदेशात 49 यांसह 2676 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.