Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
‘लक्ष्मण’रेषा ओलांडली; भाजपकडून जनसंपर्क विभागावर ‘बाण’वार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/political-leader.jpg)
- वाकड येथील विकासकामे भूमीपूजन कार्यक्रमावरुन घमासान
- आमदार जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांना डावलले
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचे कामकाज चालवण्यासाठी ‘लक्ष्मण’ रेषा आखण्यात आली आहे. अर्थात नियमानुसारच कामकाज चालवणे अपेक्षीत आहे. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी निमंत्रण पत्रिकेपासून ‘प्रोटोकॉल’ ठरलेले आहे. मात्र, महापालिका जनसंपर्क विभागाला ‘लक्ष्मण’ रेषा ओलांडणे महागात पडले आहे.
विशेष म्हणजे, चिंचवड विधानसभा मतदार संघात महापालिकेच्या रस्त्याचे महापौरांनी भूमीपूजन केल्यावरून भाजपअंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचा राग माहिती व जनसंपर्क विभागावर काढला जात आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्यात हा रस्ता येत असल्यामुळे स्थायी समिती सभेत बुधवारी (दि.३०) सभापतींसह भाजपच्या सदस्यांनी संताप व्यक्त केला. जगताप समर्थकांनी महापौर नितीन काळजे यांना दोष न देता त्यांच्याबाबत मनात निर्माण झालेला राग माहिती व जनसंपर्क विभागावर काढला आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रभाग क्रमांक 25 मध्ये रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला. हा प्रभाग शिवसेनेचा असल्याने गटनेते राहूल कलाटे यांनी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते रस्त्याचे भूमीपूजन केले. त्यामुळे आमदार जगताप यांना हा प्रकार चांगलाच झोंबल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये महापौरांविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. परंतु, महापौर नितीन काळजे यांच्यावर राग व्यक्त करता येत नसल्याने जगताप यांच्यासह त्यांच्या समर्थकांची अवस्था आपलेच दात अन आपलेच ओठ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांनी माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांना ‘टार्गेट’ केले आहे.
अण्णा बोदाडे सत्ताधा-यांच्या निशाण्यावर…
भूमीपूजन असो अथवा उद्घाटन, त्यासंदर्भात माहिती व जनसंपर्क विभागाकडून पदाधिका-यांसह प्रशासकीय विभागांना निमंत्रण पत्रिका पाठविली जाते. मात्र, त्यातही बोदडे यांनी चूक केल्याने जगताप समर्थकांचा पारा वाडला आहे. बोदडे यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण एक दिवस अधी दिले. मात्र, कार्यालयीन कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी काही मिनीटे अगोदर दिले. विशेष म्हणजे भूमीपूजनाची वेळही प्रशासकीय कामकाज सुरू होण्याच्या अगोदर काही मिनीटे म्हणजे नऊच्या सुमारास ठेवली. मुळात निमंत्रण पाठविण्यासाठी महापौरांची परवानगी सायंकाळी साडेपाच दरम्यान मिळाली. त्यातच माहिती व जनसंपर्क विभागाचीही चुक असल्याने अधिकारी बोदडे यांच्यावर हे प्रकरण शेकले आहे.