धक्कादायक…वाकड येथील अभियंत्याची आत्महत्या; १२ व्या मजल्यावरुन मारली उडी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/2-26.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातल्या वाकड इथे राहणाऱ्या आणि मोठ्या नामांकित कंपनीत नोकरीला असणाऱ्या एका संगणक अभियंत्याने राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रसूनकुमार झा हे या अभियंत्याचं नाव आहे. 28 वर्षीय प्रसूनकुमार हे राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये नोकरीला होते. इन्फोसिसमध्ये सॉ़फ्टवेअर इंजिनिअर म्हणून ते कार्यरत होते, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातून देण्यात आली. वाकडच्या लॉरेल सोसायटीत राहणारे झा मुळचे बिहारच्या दरभंगाचे होते. त्यांनी याच राहत्या सोसायटीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
गेली काही वर्षं झा याच परिसरात राहात होते. त्यांनी नेमक्या कुठल्या कारणामुळे हे टोकाचं पाऊल उचललं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.
वाकड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, झा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे. ते पुण्यात एकटेच राहात होते. प्रेमप्रकरणातून नैराश्य आलं होतं का या बाबींवर पोलीस चौकशी करत आहेत. पिंपरी चिंचवड शहर पूर्ण लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे शहरात संचारबंदी आहे. अनेक आयटी कर्मचारी घरूनच काम करत आहेत.