#CoronaVirus: मुंबईत ७५ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यासाठीची तयारी!
मुंबईत करोनाचे रुग्ण रोजच्या रोज वाढत असून मे च्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या तीस हजारापुढे जाईल असा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांचा आहे तर आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते साठ हजारापर्यंत करोनाची लागण होईल. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता ७५ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यास सुरुवात केली आहे.
प्रामुख्याने मुंबईतील करोनाची लागण होत असल्याची संख्या वाढत असून त्याची गती लक्षात घेऊन पालिकेने एकीकडे रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याचे काम हाती घेतले आहे तर दुसरीकडे संस्थात्मक क्वारंटाइनची संख्या वाढविण्यासाठी विभागवार शाळा, मंगल कार्यालयं, विविध संस्थांचे हॉल आदी ताब्यात घेण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात आजच्या घडीला १,१९,१६१ लोक घरीच क्वारंटाइन आहेत तर ८,८१४ लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे.