धक्कादायक! जग Covid-19 च्या संकटात असताना दक्षिण चीन सागरात चीनची ‘दादागिरी’
“करोना व्हायरसच्या संकटाचा सामना कसा करायचा याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. चीन या परिस्थितीचा फायदा उचलून दक्षिण चीन सागरात आपल्या महत्वकांक्षा रेटून नेण्यामध्ये गुंतला आहे” असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.
संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपलाच अधिकार असल्याचा चीनचा दावा आहे. यावरुन चीनचा व्हिएतनाम, मलेशिया, फिलीपाईन्स आणि तैवान या देशांबरोबर वाद सुरु आहे. दक्षिण चीन समुद्र नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. त्यामुळे चीन या सागरी भागावर आपला अधिकार सांगत आहे.
दक्षिणपूर्व आशियाई देशांच्या संघटनेचे १० सदस्य आहेत. या सदस्यांबरोबर माइक पॉम्पिओ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन संवाद साधला. करोना व्हायरसबरोबर वादग्रस्त बेटांवर प्रादेशिक जिल्हे जाहीर करण्याचा मुद्दा पॉम्पिओ यांनी उपस्थित केला. “करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा चीन फायदा उचलत आहे. अन्य देशांनी तेल आणि गॅस प्रकल्पापासून दूर रहावे, त्यांना धमकावण्यासाठी चीन युद्धनौकांची तैनाती करत आहे” असा आरोप पॉम्पिओ यांनी केला.
काही दिवसांपूर्वी चीनने केला युद्ध सराव
काही दिवसांपूर्वी चीनने दक्षिण चीन महासागरात युद्ध सरावही केला होता. अॅन्टी शिप, अॅन्टी सबमरीन आणि अॅन्टी एअरक्राफ्ट बंदुकांच्या मदतीनं चीननं या क्षेत्रात मोठा युद्ध सराव केला. या क्षेत्रात असेलेला आपला प्रभाव दाखवून देणं हा या युद्धसरावामागील चीनचा हेतू होता. याव्यतिरिक्त चीननं फ्लीटच्या नेव्हिगेशनचाही सराव केला. चीनच्या या युद्ध सरावानंतर अमेरिकेनं कठोर शब्दात याचा निषेध केला आहे.