#COVID19 : रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटी रुपये मदत; शरद पवार यांची घोषणा
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाविरुद्धतच्या लढाईत राज्य सरकारला सहकार्य करण्यासाठी आता शैक्षणिक संस्थाही सरसावल्या आहेत. रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता २ कोटी रुपयांचा निधीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी म्हटले आहे की, कोरोना या जागतिक महामारीचा सामना महाराष्ट्र सरकार मोठ्या धैर्याने करत आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्याने एक नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्याही प्रसंगी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्था नेहमीच पुढे आल्या आहेत. परंतु संपूर्ण टाळेबंदीमुळे रोग निवारण कामी शिक्षण संस्थांना सक्रिय होता येत नाही.अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून रयत शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतना इतकी सुमारे दोन कोटी रुपये रक्कम धनादेशाद्वारे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड-१९’ मध्ये जमा करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे.