#CoronaVirus: व्हेंटिलेटर्स संबंधी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, मित्रांनाही देणार मदतीचा हात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Donald-Trump-1.jpg)
करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातून व्हेंटिलेटर्सना मोठया प्रमाणावर मागणी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेंटिलेटर्ससंबंधी महत्वाची घोषणा केली आहे. “करोना व्हायरसविरोधातील लढयात आमच्या मित्र देशांना व्हेंटिलेटर्सची गरज असेल, तर तो पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतच करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांवर उपचारांसाठी अमेरिकेत व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय साहित्याच्या उत्पादनांचा वेग वाढवण्यात आला आहे. ‘आम्ही मित्र राष्ट्रानांही वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करु’ असे ट्रम्प यांनी सांगितले.
करोना व्हायरसची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी मी फोनवरुन चर्चा केली, त्यावेळी त्यांनी व्हेंटिलेटर्सची पहिली मागणी केली असे ट्रम्प म्हणाले. “बोरीस जॉन्सन यांनी व्हेंटिलेटर्सची मदत मागितली. दुर्देवाने त्यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते लवकरच यातून बरे होतील, याची मला खात्री आहे. त्यांना, इटली, स्पने, जर्मनी या सर्वच देशांना व्हेंटिलेटर्स हवे आहेत” असे ट्रम्प म्हणाले.
“अमेरिका मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्स बनवेल. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करुच पण त्याचबरोबर दुसऱ्या देशांनाही मदत करु” असे ट्रम्प यांनी सांगितले. पुढच्या १०० दिवसात १ लाखापेक्षा जास्त व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्याचे लक्ष्य अमेरिकेने समोर ठेवले आहे.