#CoronaVirus : मी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन : संजय राऊत
मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युचं स्वागत केलं आहे. पंतप्रधानांच्या जनता कर्फ्युच्या संकल्पनेचं आम्ही स्वागत करतो. त्या दिवशी मी स्वतः सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे असलो तरी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेल असंही नमूद केलं. यामुळे रविवारी संजय राऊत अॅक्शन मोडमध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यु संकल्पनेचं आम्ही स्वागत करतो. ते योग्य आवाहन आहे. डॉक्टर्स, नर्स अत्यावश्यक सेवा देत आहेत यांचे आभार मानायलाच हवेत. सैनिक युद्धावर लढतात तसे ते सर्व आपली जबाबदारी पार पाडत आहेत. विषाणूशी लढा देत आहेत. मी स्वतः सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे असलो तरी अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून कामगिरी पार पाडत असतो. मी ‘सामना’त आहे आणि खासदार आहे. अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी रविवारी अत्यावश्यक सेवेचाच भाग असेन.”
जगात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना भारताने बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लढाईला भावनिक टच दिला आहे, पण आपण हे युद्ध म्हणून देखील पाहात आहोत, असंही संजय राऊत यांनी यावेळी मान्य केलं.