पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन व्यवहार ठप्प, सर्वत्र शुकशुकाट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/8-11.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. एसटी आगार, पीएमपी, लोकल यांच्या दैनंदिन प्रवासी संख्येत घट झाली आहे. त्यामुळे काही मार्ग बंद ठेवण्याचा प्रस्ताव दोन्ही प्रशासनाच्या विचाराधीन आहे. रेल्वे प्रवासीसंख्येवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शहरात तब्बल आठ रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.
पिंपरी कॅम्प येथील भाजी मंडईतील भाज्या खरेदीसाठी गर्दीही कमी झाली आहे. हॉटेल्स, खाणावळींकडून किराणा मालाची मागणी कमी झाली आहे. रिक्षाथांब्यांवर चालक प्रवाशांसाठी ताटकळत उभे असल्याचे दिसून आले.
मंडईपासून बाजारपेठांपर्यंत, रिक्षा थांब्यांपासून रेल्वे स्थानकांपर्यंत, छोट्या रस्त्यांपासून महामार्गापर्यंत, किरकोळ वस्तू दुकानापासून मॉलपर्यंत हे चित्र दिसले. नागरिक घराबाहेर पडलेच नाहीत. त्यातच सर्वकाही बंद असल्याने शहर थांबल्याचा भास झाला. रुग्णांची संख्या वाढली नसली, तरी लोक धास्तावले असल्याचे पाहायला मिळाले.
महापालिकेच्या वैद्यकीय अहवालानुसार ‘कोरोना’चा संशय असलेल्या शहरातील ४८ संशयितांच्या द्रवाचे नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. चार संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ४१ जणांचा अहवालातील शनिवारी (14) आढळलेल्या पाच पॉझिटिव्ह आढळले असून रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत. दाखल असलेल्या ४१ जणांची प्रकृती स्थिर आहे. २१ जणांचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.