पोलिस आयुक्तालयाच्या सर्व पोलिस ठाण्यात तक्रारदारांचा उद्या मेळावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/8-9.jpg)
सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिन्याच्या प्रत्येक शनिवारी तक्रारदार, फिर्यादी मेळावा
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिन्याच्या प्रत्येक शनिवारी तक्रारदार, फिर्यादी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात तक्रारदारांच्या समस्या ऐकून त्यांना तात्काळ न्याय देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. उद्या, शनिवारी (दि. 14) पहिला फिर्यादी मेळावा होणार आहे.
महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते दुपारी दोन या कालावधीत तक्रार मेळावा होणार आहे. आहे. या मेळाव्यात नवीन तक्रारी ऐकून, समजून आणि त्यावर कारवाई केली जाणार आहे. तर दुपारी तीन ते सहा या कालावधीत फिर्यादी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, चौकशी सद्यस्थिती आणि इतर आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी फिर्यादी मेळाव्याची संकल्पना सुरु केली आहे. याबाबत त्यांनी मागील आठवड्यात सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या शनिवारी पहिला फिर्यादी मेळावा घेण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, फिर्यादी आणि समस्यांकडे पोलीस अधिकारी गांभीर्याने लक्ष घालणार आहेत. असेही म्हटले आहे.