पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १०वर; ३११ रुग्ण देखरेखीखाली
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात शुक्रवारी आणखी एक करोना रुग्ण आढळला असून पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. तर राज्यातील करोना रुग्णांचा आकडा १७ वर गेला आहे. तसेच पुण्यात ३११ रुग्ण देखरेखीखाली आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील करोना रुग्णांची माहिती दिली. पुण्यात आजही करोनाच रुग्ण आढळल्याने पुण्यातील करोना रुग्णांचा आकडा दहावर गेला आहे.य पुण्यात आतापर्यंत ७०० प्रवाशांना तपासण्यात आलं आहे. त्यापैकी २३५ आंतर रुग्ण आहेत. ३११ जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून २११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर २४ जण दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचं कारण नाही, असं म्हैसेकर यांनी सांगितलं. करोना संशयितांचे एकूण २३३ नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी २२४ जणांचे अहवाल आले आहेत. ९ अहवाल येणं बाकी असून एक नमूना चाचणी अपुरी (अप्रमाणित) असल्याचं त्यांनी सांगितलं. यापैकी १० जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांच्या संपर्कातील ३४० लोकांची तपासणी करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चारही जिल्ह्यात एकही करोना रुग्ण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, कोल्हापूरमध्ये ४४, सांगलीत ६, साताऱ्यात ९ आणि सोलापूरमध्ये ७ जण परदेशातून जाऊन आलेले आहेत. त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून असून त्यांना १५ दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. ज्यांना घरात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशा लोकांनी त्यांच्या कुटुंबातील लोकांशीही कमीत कमी संपर्क करावा. एका वेगळ्या खोलीत त्यांनी राहावं, असंही त्यांनी सांगितलं.