कोरोना संसर्ग, पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर थुंकणा-या 119 जणांवर दंडात्मक कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/7-9.jpg)
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 17 हजार 850 रुपये इतका दंड वसूल
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
कोरोना संसर्ग झालेले तीन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळल्याने महापालिकेची वैद्यकीय विभागासह अन्य विभागही सर्तक झाले आहेत. त्यानूसार आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणा-यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात रस्त्यावर थुंकणा-या 119 जणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. यापुढे शहरात रस्त्यावर थुंकणा-यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्य आरोग्य कार्यकारी अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय यांनी दिला आहे.
शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यानूसार पिंपरी चिंचवड शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय परिसरात आज (दि.१३) आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तींविरुध्द र.रु.१५०/- प्रतिव्यक्ती याप्रमाणे एकूण ११९ व्यक्तींवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानुसार एकूण १७ हजार ८५० इतका दंड संबंधितांकडून वसुल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रसाराचे पार्श्वभूमीवर सदरची कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे नागरिकांनी कटाक्षाने टाळावे असे आवाहन आरोग्य अधिकारी डाॅ. राॅय यांनी केले आहे.