#CoronaVirus : इराणमध्ये अडकलेले भारतीय मुंबईत दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Air-Iran.jpg)
मुंबई | कोरोना विषाणूमुळे गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये अडकून पडलेले ४४ भारतीय शुक्रवारी दुपारी इराण एअर इंडियाच्या विशेष विमानानं मुंबईत परतले आहेत. कोरोना विषाणूचा चीननंतर सर्वाधिक फटका बसलेल्या देशात इराणचाही समावेश आहे. चीननंतर, इराण, इटली, कोरिया देशात कोरोनामुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे.
कोरोनामुळे इराणनं विमान वाहतुकीस बंदी घातली आहे. प्राथमिक माहितीनुसार हजारो भारतीय इराणमध्ये अडकले होते. ५८ भारतीय नागरिकांना नुकतंच भारतात आणण्यात आलं होतं. त्यानंतर इराण एअर इंडियाच्या विशेष विमानानं काही भारतीय दुपारी १२ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आले आहेत. त्यांना तूर्त घाटकोपरमधील रुग्णालयात नेण्यात येणार आहे तिथून या प्रवाशांना जेसलमेर येथे घेऊन जाण्यात येणार आहे.
राजस्थानमध्ये जवळपास १२० भारतीयांना पुढील १४ दिवसांसाठी विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहे त्यांच्या आरोग्याची तिथे तपासणी केली जाणार आहे.परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या विविध भागात ६ हजार भारतीय आहेत. यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.