सेवा क्षेत्रात गेल्या ७ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-52.png)
भारतातील सेवा क्षेत्रामध्ये सलग पाचव्या महिन्यात वाढ झाल्याचे दिसून आले. ही वाढ या क्षेत्रातील गेल्या सात वर्षांतील सर्वांत जास्त आहे. सेवा क्षेत्रातील मासिक सर्वेक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार इतर देशांकडून कामाच्या ऑर्डरमध्ये झालेली वाढ, निर्यातीत झालेली वाढ आणि व्यवसायातील विश्वासाचे वातावरण यामुळे परिस्थिती सुधारली आणि सेवा क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/download.jpg)
आयएचएस मार्केट इंडियाचा सेवा व्यवसाय निर्देशांक जानेवारीमध्ये ५५.५ होता. तो वाढून ५७.५ इतका झाला आहे. जानेवारी २०१३ च्या तुलनेत हा निर्देशांक वरचढ आहे.
या अहवालानुसार गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये नव्या व्यवसायात वाढ झाल्याचे दिसून आले. ही वाढ गेल्या सात वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची होती. परदेशातून मिळणाऱ्या कामाच्या ऑर्डरमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय सेवांसाठी आंतरराष्ट्रीय मागणी गेल्या काही वर्षांमध्ये मध्यम स्वरुपाचीच होती. त्यामध्ये गेल्या काही महिन्यात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.