‘वादग्रस्तांना’ शांत करण्यासाठी रोड स्वीपरच्या निविदेत 97 कोटींची ‘निर्विवाद’ वाढ !
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पारदर्शक कारभार करत असल्याचा आव आणणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी चक्क प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. यांत्रिक सफाई (रोड स्वीपर) कामाच्या वादग्रस्त निविदेत आणखी 97 कोटींची वाढ करण्यासह असंख्य उपसूचना घुसडून त्या मंजूर केल्याची बाब समोर आली आहे. महासभेतील गोंधळाचा फायदा घेऊन हा प्रताप केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे भाजपच्याच नगरसेवकांना याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. महासभा होऊन दुसरा दिवस मावळला तरी महापौरांकडील उपसूचना अद्याप नगरसचिवांच्या ताब्यात मिळाल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. महासभेत उपसूचना देण्याची पध्दत बंद करा, असे आदेश काही दिवसांपूर्वी पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. परंतु, महापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवित सभेत उपसूचना दिल्या. त्यातही सभागृहात झालेल्या गोंधळाचा फायदा घेत आपल्याच नगरसेवकांना माहिती नसलेल्या वादग्रस्त उपसूचना दिल्या. त्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये दुफळी निुर्माण झाली असून पक्षाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वादग्रस्त ठरलेल्या यांत्रिक सफाईकामाच्या निविदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्या निविदेचा खर्च 647 कोटींवरुन 742 कोटी रुपये करण्याची किमया भाजपने केली. वार्षिक 97 कोटी रुपये खर्च गृहित धरुन काढलेली निविदा आता वार्षिक 106 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. परंतु, भाजपच्याच नगरसेवकांना ही उपसूचना माहिती नसल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर, नगरसचिव उल्हास जगताप यांनी या प्रकाराबाबत आणखी संशय वाढवला आहे. उपसूचना दिल्या असे सांगताना त्या आपल्यापर्यंत आल्या नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतले झोपेचे सोंग
पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकीकडे रोडस्वीपरसारख्या विषयावर सत्ताधारी नगरसेवक विरोध करत आहेत. पक्षाच्या कारभारावर आक्षेप घेत आहेत. तर, दुसरीकडे महापालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेकांनी भाजपच्या कारभाराबाबत व उपसूचनांच्या या गंभीर प्रकाराबाबत निद्रा धारण केली आहे. रोडस्वीपरसारख्या निविदेत विरोधकांचेही सोटेलोटे झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे. विरोधकांना मॅनेज केल्यामुळेच याला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक पुढे येताना दिसत नाही, असा आरोप नागरिकांमधून होत आहे.