दिल्ली आंदोलन: आंदोलनालाआधी हाती होतं गुलाबाचं फुलं नंतर आल्या हातात काठ्या, लोखंडी सळ्या, दगड, विटा …
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-173.png)
दिल्ली | महाईन्यूज |
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला हिंसक वळण लाभलं यात ५ जण मृत्युमुखी पडले. सोमवारी सकाळी ११ वाजता सीएए विरोधातील आंदोलनकर्ते हातात लाल रंगाचे गुलाब घेऊन जाफराबाद मेट्रो स्थानकाजवळ जमले. या स्थानकापासून साधरण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सीएए समर्थकांचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत करण्याच्या प्रतीक्षेत आंदोलनकर्ते होते.
त्यांनी आमच्यावर दगड फेक केली तरीही आम्ही गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत करू असं सीएए विरोधातील आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. मात्र दुपारी 2 नंतर या आंदोलनाचा सारा रंग पालटला… हातात गुलाबाऐवजी काठ्या, लोखंडी सळ्या, दगड, विटा, काचेच्या बाटल्या आल्या. स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. बाहेर असलेल्या इमारतीमधील दुकानं, घरांना आग लावण्यात आली. हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीनच्या सुमार अतिरिक्त दल मागवण्यात आलं. जाफराबादच्या रस्त्यावर दगड, विटा, काचेच्या बाटल्या पडलेल्या होत्या. प्रेमाचं प्रतीक म्हणून हातात आणलेली गुलाबाची फुलं पायदळी केव्हाच चिरडली गेली होती.
‘सकाळी दहा वाजता आम्ही म्हणजे सीएए विरोधी आंदोलक हातात गुलाबाची फुलं घेऊन उभे होतो. आम्ही बॅरिकेडच्या मागे होतो, मात्र काही सीएए समर्थक आमच्या दिशेनं आले त्यांच्या हातात काठ्या, काचेच्या बाटल्या होत्या आम्ही फुलं दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आमच्यावर हल्ला केला या हल्ल्याचा प्रतिकार आम्ही केला कारण ते आमच्या बहिणी, मुलींवर हल्ला करत होते’, अशी प्रतिक्रिया सीएए विरोधी आंदोलकानं दिली.
या हिंसक वळणानंतर CAA विरोधक आणि समर्थक दोनाही गट एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत . दरम्यान सध्या इथली परिस्थिती तणावग्रस्त असून अनेक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.