शाळेनंतर आता महाविद्यालयाचे कामकाजही राष्ट्रगीतानंतरच होणार सुरु…

१९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात येणार आहेत..शाळेनंतर आता महाविद्यालयाचे कामकाजही राष्ट्रगीतानंतरच सुरु होणार… महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मंत्रालयाने याबाबत निर्णय घेतला आहे.

१९ फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालयांना हा आदेश लागू होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. या नियमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होण्यास मदत होईल, असेही सामंत यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमात उदय सामंत म्हणाले की, महाविद्यालयामध्ये दररोज राष्ट्रगीत गायले जावे, असा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. १९ फेब्रुवारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर याची सुरुवात होईल. राज्यातील सर्व महाविद्यालयांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली. हा नियम महाराष्ट्रातील प्रत्येक अभियांत्रिकी, फार्मसी यासारख्या महाविद्यालयांनाही लागू असेल. असा नियम लागू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.





