पिंपरी-चिंचवड शहर राहण्यासाठी कसे? हे नागरिकांनो.. तुम्हीच सांगा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/shravan-hardikar-759.jpg)
पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|
नागरिकांना त्यांच्या महापालिका क्षेत्रात उत्तम दर्जाच्या राहणीमानासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने राहणीमान सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. याअंतर्गत शहरात १ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहराला या दशकभरात सर्वोच्च राहणीमानयोग्य करण्यात येणार आहे. गेल्या सर्वेक्षणात शहराचा क्रमांक ६९ होता. यंदा अधिक वरचा क्रमांक मिळणे अपेक्षित आहे.
सर्वेक्षणामागे नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे, हे सर्वेक्षणाचे केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमाबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (बुधवारी) माहिती दिली.
या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहण्यास योग्य शहर, पालिकेचे कामकाज व शहराचे हवामान, याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतर शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. प्रशासनाचे कामकाज व अंमलबजावणी, याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे, हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. या सर्वेक्षणाद्वारे मिळणाऱ्या माहितीमुळे महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांची मते जाणून घेणे शक्य होणार आहे. तसेच, प्रशासनाला या अडचणींचे निराकरण करणे शक्य होईल.
कसे नोंदवाल मत…
सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने या सर्वेक्षणात सहभागी व्हावे. त्यासाठी https://eo12019.org/citizenfeedback या संकेतस्थळावर जाऊन तसेच त्यासोबतचा क्यूआर कोड स्कॅन करावा. त्यानंतर तेथे प्रथम महाराष्ट्र राज्य आणि त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांना तेथे आपले मत नोंदविता येईल. याव्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने शहरात शाळा, महाविद्यालये, मॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांसह सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नागरिकांना माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.
हे असतील प्रश्न
नागरिकांना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य सुविधांचा दर्जा, उपलब्धता व क्रयशक्ती यांसारख्या प्रश्नांचा समावेश असेल. यामध्ये नागरिकांना त्यांच्या उत्तरासाठी पूर्ण सहमत, सहमत, समाधानी, असमाधानी व पूर्ण असमाधानी हे पाच पर्याय असतील. प्रामुख्याने राहणीमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता आणि चिरंतन व स्थायी सुविधा आदींचा सर्वेक्षणात विचार केला जाईल. जूनमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येईल. या सर्वेक्षणासाठी अद्ययावत सर्वेक्षण पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.