विद्यापीठ रस्त्यावरील ‘रचनात्मकदृष्ट्या चुकलेले’ तिन्ही पूल पाडण्याचे संकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/5-7.jpg)
पुणे |महाईन्यूज|
शिवाजीनगर ते पुणे विद्यापीठ रस्त्यावरील तिन्हीही उड्डाणपूल पाडून नवीन पूल बांधण्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पवार यांनी या तिन्ही पुलांच्या बांधकामात रचनात्मकदृष्ट्या चूक झाली असल्याचे सांगितले.
शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हे ‘रचनात्मकदृष्ट्या चुकलेले’ पूल पाडून तिथे नवीन आणि मोठे पूल बांधण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार म्हणाले, या उड्डाणपुलांची नव्याने रचना करणे गरजेचे आहे. नाहीतर वाहतूक कोंडीसाठी पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरचा पूल, शिवाजीनगरचा कृषी महाविद्यालयाच्या समोरचा पूल आणि राहुल थिएटर समोरील पूल पाडून याठिकाणी नागपूर शहरातील उड्डाणपुलासारखे वरून मेट्रो, मध्ये चारपदरी रस्ता आणि खालून रस्ता असा नवीन मोठा पूल बाधण्यांचे सूतोवाच पवार यांनी या वेळी केले.