सावधान… महापालिका कुलरचे तुम्ही पिताय शेवाळयुक्त पाणी
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष; साफसफाई करणा-या ठेकेदारांवर कारवाई करा
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विविध ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. त्यात दुस-या मजल्यावर बसविलेल्या कुलरची दुर्गंधी सुटली असून पाण्यात शेवाळ निर्माण झालेले आहे. पालिकेत कामानिमित्त दररोज येणारे नागरिक तेच पाणी पित असल्यामुळे त्यांच्या जिवाशी महापालिकेचे आरोग्य विभाग खेळू लागले आहे.
महापालिकेच्या दुस-या मजल्यावर असणा-या पिण्याच्या पाण्याचा कुलरची स्वच्छता केल्याचे दिसत नाही. कुलरमधील पाण्याची दुर्गंधी येवू लागलेली आहे. त्या ठिकाणचे अॅक्वागार्ड देखील बंद अवस्थेत आहे. तेथील अॅक्वागार्डच्या पाईपमध्ये सर्वत्र शेवाळ तयार झालेले आहे. पाण्याच्या कुलरवर झुरळ देखील फिरत आहेत. परंतू, दैनंदिन अडीअडचणी घेवून पालिकेत येणा-या हजारो नागरिक तेच पाणी पित आहेत. सदरील पाण्यात शेवाळ निर्माण होवूनही त्या कुलरची स्वच्छता केलेली नाही. आरोग्य विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याने शेवाळयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.
दरम्यान, कुलरमधील पिण्याचे नागरिकांना पाजून आरोग्य विभाग नागरिकांच्या जीवाशी खेळू लागले आहे. त्यामुळे कुलरची साफसफाई, देखभाल दुरुस्ती न करणा-या ठेकेदार, संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामर्थ्य प्रबोधिनी संस्थेचे सुशांत भिसे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.