मी भाजप सोडणार या अफवा – पंकजा मुंडे
औरंगाबाद |महाईन्यूज|
मी भाजप सोडणार या अफवा आहे. या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे नमूद करतानाच मी पक्षात कुणावरही नाराज नाही आणि कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडणार नाही, असे माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज स्पष्ट केले.
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आज विभागीय कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. हे आंदोलन पंकजा यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले असले तरी भाजपचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवत पक्ष पंकजा यांच्यासोबत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे नेते पंकजा यांच्यासोबत व्यासपीठावर हजर राहिले. पंकजा यांच्या आंदोलनाला पक्षाची पूर्ण साथ असेल असा विश्वास सर्वच नेत्यांनी यावेळी दिला. तोच धागा पकडत पंकजा यांनी सर्व नेत्यांचे आभार मानताना टोलेबाजीही केली.