एटीएम मशिन गॅस कटरने कापून आठ लाखांची रोकड चोरट्यांनी केली लंपास

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील आठ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी (ता.27) सकाळी वाकड येथे उघडकीस आली. या घटनेत एटीएम मशिनला आग लागल्याने मशिनचेही नुकसान झाले.
वाकड पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या दत्त मंदीर रस्त्याला ऍक्सिस बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. अज्ञात चोरट्यांनी येथील मशिन गॅस कटरच्या साहय्याने कापून आठ लाखांची रोकड लंपास केली. सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत. ही घटना रात्री घडली असल्याची शंका पोलिसांना आहे.
दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून शहरात एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केलेली आहे. तरीही एटीएम फोडीच्या घटना कमी झालेल्या नाहीत.




