सत्तेत ठाकरे सरकार, मात्र कॅलेंडरवर झळकते फडणवीस सरकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/uddhv-jpg_710x400xt.jpg)
मुंबई | महाईन्यूज |
महाराष्ट्रात ठाकरे सरकार येऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत असताना देखील प्रशासकीय अधिका-यांना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचे विस्मरण व्हावे, असा लांछनास्पद प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र विधानमंडळाच्या कॅलेंडरवर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री दाखवले आहे. जानेवारी २०२० चे कॅलेंडर असून त्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच फोटो छापण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून हरिभाऊ बागडे यांचा फोटो देखील छापला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/calender-11-297x447-1.jpg)
या नवीन वर्षातील कॅलेंडरवर राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून छापण्यात आले आहे. कॅलेंडर छापणाऱ्यांना जिथे मुख्यमंत्री कोण हेच ठाऊक नाही, तिथे इतर पदावरचे लोक कोण असतील? मंत्रिमंडळ कसं बदललं आहे. विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत, हे नक्कीच माहित नसणार. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
भाजपची सत्ता जाऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, विधानमंडळाचे कॅलेंडर छापणाऱ्यांना या कोणत्याही गोष्टींची कल्पनाच नसावी, असे चित्र स्पष्ट दिसत आहे.