बापरे! पोलीस ठाण्यातच डल्ला; 185 मोबाईलसह 7 लाखांची रोकड लंपास
कोल्हापूर | महाईन्यूज
बँका, मंदिरं, घरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना काही नवीन नाहीयेत, असे प्रकार घडल्यावर लगेचच पोलिसांना माहिती दिली जाते. यानंतर पोलिसांकडून तपास केला जातो आहे. मात्र कोल्हापूरमध्ये चक्क पोलीस ठाण्यावरच चोरट्यानं डल्ला मारलेला आहे. त्यामुळे पोलीस ठाणंच सुरक्षित नसेल, तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोल्हापूरातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून तब्बल १८५ मोबाईल चोरीला गेलेले आहेत. पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाईल हस्तगत केले गेले होते. त्यांची किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात आहे.
गुरुवारी रात्री उशिरा हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे मात्र सध्या कोल्हापुरात सर्वत्र याच घटनेची चर्चा आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महमद पटेल यांनी तक्रार दाखल केलली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या कारकून स्टोअर रूममध्ये अज्ञातानं प्रवेश केला व लोखंडी कपाटातून विविध गुन्हे व कारवाईत जप्त करण्यात आलेले १८५ मोबाईल फोन त्यानं लंपास केले आहेत. याशिवाय ७ लाखांची रोकडदेखील लांबवली आहे. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं आहे. यासोबत ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं काही पुरावेदेखील गोळा करण्यात आले.