नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू – अभिनेत्री तनुश्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3-7.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू, असा आरोप अभिनेत्री तनुश्रीने केला आहे. ‘पाटेकर यांच्याविरोधात दहा वर्षांपूर्वी तक्रार केली, तेव्हा अॅड. पावसकर हे स्वत:हूनच मला भेटले आणि त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले.
पाटेकर हे बडे प्रस्थ असल्याने ते तुम्हाला तुरुंगात टाकतील वगैरे सांगून त्यांनी माझ्यावर दबाव आणला आणि माझ्याकडून चित्रपटातील कामाविषयीच्या मूळ कंत्राटाची प्रत व अन्य कागदपत्रेही नेली. मात्र, ते अनेक प्रकरणांत पाटेकर यांचे वकील आहेत, ही बाब त्यांनी माझ्यापासून दडवली होती,’ असा आरोप तनुश्रीने पत्रकार परिषदेत केला.
नाना पाटेकर यांच्याकडून विनयभंग झाल्याच्या प्रकरणात मी पीडित असताना त्या काळात बॉलीवूडमधील काही लोकांनी जाणीवपूर्णक माझ्याविरोधात खूप बदनामीकारक माहिती पसरवली. त्यामुळे माझे करिअर उद्ध्वस्त झाले. नाना पाटेकर हे ढोंगी आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली आणि पूरपीडितांसाठी पाचशे घरे निर्माण करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून देश-परदेशांतून जमवला. मात्र, त्याचा वापर कसा आणि कुठे केला, हे कोणी तपासले का? कोणी त्याविषयीची कागदपत्रे तपासते का? गरीब शेतकऱ्यांच्या नावाखाली त्यांच्याकडून भ्रष्टाचार होत आहे, असा गंभीर आरोपही तनुश्रीने केला.