अबब… अडीच लाख रुपये घेतली लाच, न्यायालयीन कर्मचा-याला रंगेहाथ पकडला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/26.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
जागेचा ताबा न देण्यासाठीची ऑर्डर करुन देण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली अडीच लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या न्यायालयीन कर्मचाऱ्यास (बेलिफ) शिवाजीनगर न्यायालयातुन शनिवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
मनोहर कांबळे असे संबंधीत न्यायालयीन कर्मचाऱ्याचे नाव आहे. न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे तसेच वॉरंट व समन्स बजावण्याची जबाबदारी न्यायालयीन कर्मचारी म्हणून बेलिफ करतात. कांबळे हा शिवाजीनगर न्यायालयामध्ये बेलिफ म्हणून कार्यरत होता.
डेक्कन येथील एका जागेचा ताब्याबाबतचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. संबंधीत प्रकरणामध्ये जागेचा ताबा न देण्यासाठीची ऑर्डर करुन देण्यासाठी मदत करण्यासाठी कांबळे याने तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवाजारमध्ये सापळा रचला. त्यावेळी कांबळे हा फिर्यादीकडून लाच स्विकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले.