पिंपरीतले शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन अमृता फडणवीस यांच्या जिव्हारी, शिवसेनेला दिले प्रत्युत्तर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/UDhav-Amruta.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविरोधात राज्यभरात शिवसेना महिला आघाडीने मोर्चा हाती घेतला. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली अमृता फडणवीस यांच्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन केले. त्याचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करत मिसेस फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
पिपंरी-चिंचवड शिवसेना महिला आघाडीच्या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, लोकांच्या माथी मारुन तुम्ही नेतृत्व सिद्ध करु शकत नाही. तो एक हल्ला असतो, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे ! असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या उत्तर देतील, असं काल शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर सर्वसामान्य शिवसैनिकांपासून नगरसेवकांनी मिसेस फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला होता.
सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, असं म्हणत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांची टिका ?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.