23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो- अजित पवार
नागपूर | महाईन्यूज |
मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी पवारसाहेबांनी दोन दिवसांपूर्वी सर्व विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांची बैठक घेतली होती. पवारसाहेबांनी सांगितलं की, नागपूरचं अधिवेशन संपेपर्यंत मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सहा मंत्री काम करतील. नागपूरचं अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 21 तारखेला अधिवेशन संपत आहे, 22 तारखेला सुट्टी आहे आणि 23 तारखेला मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असं अजित पवार म्हणाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते.
अजित पवारांनी यावेळी नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भात मत व्यक्त केलं आहे. या कायद्याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं आहे केंद्रानं मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या मंजुरीची गरज नाही. तर दुसरीकडे राज्याच्या मंजुरीची गरज असल्याचंही सांगितलं जात आहे. दोन दिवसांत नागपूरचं अधिवेशन संपेल. मुंबईला जाऊन ऍडव्होकेट जनरलकडून यासंदर्भात मार्गदर्शन घेऊ. हा कायदा लागू करण्यासंदर्भात माहिती पूर्ण घेतल्याशिवाय बोलणं योग्य ठरणार नसल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.