पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ नागरिकांच्या सेवेत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्यात सर्वज प्रशासकीय कार्यालये डिजीटल होत असताना आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने देखील आपले स्वतंत्र संकेतस्थळ निर्माण केले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) संकेतस्थळाचे अनावरन करण्यात आले.
pcpc.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड पोलीस नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाले. त्यानंतर आयुक्तालयाने विविध विभाग सुरू केले. नागरिकांशी संवाद वाढविण्यासाठी 16 जुलै 2019 रोजी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्विटर अकाउंट देखील सुरू केले.
Pimpri Chinchwad Police असे ट्विटर अकाउंटच्या प्रोफाइलचे नाव आहे. तर, @PCcityPolice या नावाने ट्विटर अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. यानंतर, पोलीस आयुक्तालयाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी. तसेच, नागरिकांच्या समस्या, पोलिसांचे नवीन उपक्रम, गुन्हेगारांची माहिती यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपली स्वतंत्र वेबसाईट सुरू केली.
या वेबसाईटमुळे पोलिसांना आणखी सक्रियपणे नागरिकांशी संवाद साधता येणार आहे. तसेच, आजपर्यंतची दप्तरी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली जाऊ शकते. त्यामुळे नगरिकांना पोलिसांची आजपर्यंतच्या कामगिरी देखील पहायला मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





