पिंपरी चिंचवडमधील एटीएम गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/10-2.jpg)
पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम चोरीच्या घटनांची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘विशेष तपास पथका’ची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
शहरात एटीएम चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात एटीएमबाबतच्या जवळपास दहा घटना घडल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात गॅस कटरने एटीएम कापून तसेच एटीएम खेचून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी चिखली येथील एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन स्थानिक आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मशीन पळवून नेणा-या आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
चाकण येथे एटीएम मशिन खेचून नेण्याच्या घटनेची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल घेतली. रविवार असूनही गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक चाकण येथे घेण्यात आली. यापूर्वी केलेल्या तपासणीमध्ये आरोपी ग्रामीण भागाच्या दिशेने पळून जाताना दिसून आले आहेत. यामुळे रविवारी आयुक्त संदीप बिष्णाई यांनी बोलविलेल्या बैठकीस ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही उपस्थित होते.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून बाहेर जाणाऱ्या आठ मार्गांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदी केली जाणार आहे. चाकण-साबळेवाडी रोड, चाकण-शिक्रापूर रोड, सोमाटणे टोल नाका, उर्से टोल नाका, खेड टोलनाका, मुकाई चौक, बापूजीबुवा खिंड, बावधन पोलीस चौकी समोर, नाकाबंदीचे पॉईन्ट नियुक्त केले आहेत. याशिवाय इतर काही ठिकाणी अचानक नाकाबंदी केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या या नाकाबंदीत एक अधिकारी व तीन कर्मचारी असणार आहेत.