मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांची ‘मातोश्री’ बाहेर निदर्शने
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/PMC-Bank.jpg)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायाची मागणी
मुंबई । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (PMC) ठेवीदारांनी आज रविवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’च्या बाहेर निषेध केला. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ डिसेंबर रोजी आणखी तिघांना अटक केली होती. तत्कालीन संचालक जगदीश मुखी, संचालक आणि कर्ज व आगाऊ रक्कम समिती सदस्य मुक्ती बावीसी, संचालक आणि रिकव्हरी समिती सदस्या तृप्ती बने, अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे.
‘पीएमसी’च्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवल्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती पाहून तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने प्रथम ‘एचडीआयएल’चे कार्यकारी अध्यक्ष राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांना अटक केली होती.